कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ झाल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारचा उद्यापासून शाळा बंद करण्याचा निर्णय


कोलकाता : देशभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये नव्याने ४ हजार ५१२ कोरोनाबाधित आढळल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये सोमवारपासून (३ जानेवारी) राज्यातील शाळा बंद करण्यात येणार आहेत.

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. तसेच खासगी व सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही ५० टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा कर्फ्यु देखील लावला आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. या निर्णयामुळे पश्चिम बंगालमध्ये सोमवारपासून (३ जानेवारी) शाळा, महाविद्यालयांसोबतच जलतरण तलाव, व्यायामशाळा, ब्युटी सलून्स देखील बंद राहतील.