खोटे बोलणाऱ्या नेते आणि मंत्र्यांबाबत संजय राऊतांनी नागरिकांना दिला सल्ला!


मुंबई – देशातील ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका नव्या वर्षात होऊ घातल्या आहेत. या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड अशी राजकीयदृष्ट्या मोठी आणि महत्त्वाची राज्य देखील असल्यामुळे साहजिकच नव्या वर्षात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहेत. त्याव्यतिरिक्त एरवीही राजकीय मंडळींकडून एकमेकांवर आरोप होतच असतात. त्यामुळे सामान्य नागरिक किंवा देशाचे मतदार यांच्यासमोर कुणावर विश्वास ठेवावा, असा पेच नक्कीच निर्माण होतो. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याचसंदर्भात सामान्य नागरिकांना एक सल्ला दिला आहे. या सल्ल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशात मोदी सभा घेतात आणि दिल्लीत येऊन कोरोना, ओमिक्रॉनवर चिंता व्यक्त करतात. याला निर्बंध कसे म्हणायचे? निर्बंधांमुळे लोकांचा रोजगार, व्यवसाय बुडाला. त्यावर सरकारकडे २०२१ सालातील उपाययोजना नव्हती आणि २०२२मध्येही नसेल. मावळते वर्ष आणि नव्या वर्षात फरक करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, कालीचरण आणि धर्मसंसद प्रकरणावरून देखील संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. २०२१ सालात महात्मा गांधींविरोधात घोषणा दिल्या, नथुराम गोडसेंचा धर्मसंसदेच्या नावाखाली जयजयकार केला. गांधींना शिव्या देणारे कुणी साधू कालिचरण हे महाराष्ट्रातील आहेत. या वृत्तीचा भाजपने साधा निषेध केला नाही. ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे, त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये आणि गांधी जयंतीस त्यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होण्याचे तरी ढोंग करू नये, अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

आपल्या लेखातून संजय राऊतांनी देशातील सामान्य नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना विनंती केली आहे. सामान्य लोकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना एकच विनंती करायची आहे. झाले ते पुरे झाले. २०२२ सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे एवढे मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे, असे राऊत म्हणाले आहेत.

मोदी व सरकार पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले, ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून १२ कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहे. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती-बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात असल्याचे देखील राऊतांनी या लेखात म्हटले आहे.