नितीन गडकरींनी मानले माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे जाहीर आभार


नागपूर – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने देशमुख यांना खंडणीचा आरोप आणि संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात १३ तास चौकशी केल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. हे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले होते. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांना शहरातील हॉटेल्स आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात देशमुख आहेत. त्यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आभार मानले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काटोल नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलत होते. त्यांनी यावेळी अनिल देशमुखांचे मी आभार मानतो, असे म्हटले आहे. नागपूर ते काटोल चौपदरी रस्त्याच्या कामासाठी परवानगी मिळण्यासाठी अनिल देशमुख यांनी मदत केली, असे गडकरी म्हणाले.


आज नागपूर ते काटोल या चौपदरी रस्त्याचा शुभारंभ झाला आहे. अनेक अडचणी या रस्त्यासाठी आल्या. वनविभागाने हा वाघांच्या जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले. माझा जन्म तुमच्या आधी झाल्याचे मी त्यांना म्हटले. एवढ्या वर्षात येथे कोणत्या गावात वाघ शिरला नाही, तर तुम्ही कुठे घुसवत आहात. त्रास द्यायचे काम कशाला करता. जेव्हा अनिल देशमुखांनी मदत केली, तेव्हा वनविभागाची परवानगी मिळाली. नाहीतर मिळतच नव्हती. या रस्त्याकरता त्यांचेही मी आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या अडचणी दूर करुन हा रस्ता पूर्ण होणार आहे. नागपूरमध्येही रस्ता चौपदरी करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील पीएमएलए न्यायालयात अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या ७०० पानांच्या पुरवणी आरोपपत्रात अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी म्हणून नाव दिले आहे. यासोबतच महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचीही नावे या आरोपपत्रात देण्यात आली आहेत.