नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा टाकला एनसीबीवर आरोपांचा बॉम्ब


मुंबई – पुन्हा एकदा एनसीबीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. नव्याने फर्जीवाडा समोर आणणार असल्याचे म्हणत मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. त्याच पदावर समीर वानखेडेंना कायम ठेवण्यासाठी दिल्लीतून एका बड्या भाजप नेत्याचे लॉबिंग सुरु असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

मलिक म्हणाले, समीर वानखेडे मागील काही दिवसांपासून मी कार्यकाळ वाढवून मागत नाही. दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार आहे. अशा बातम्या पेरल्या जात आहेत. कार्यकाळ संपल्यानंतरही अजूनही त्यांची बदली का करण्यात आली नाही? असा सवाल मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान मलिक यांनी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. मलिकांनी म्हटले की, मला आणि माझ्या कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. मागील वर्षी फर्जीवाडा समोर आणला तसा या वर्षीही समोर आणणार आहे.

पत्रकार परिषदेत मलिक यांनी सांगितले की, हजारो करोडो रुपयांची वसुली मागील काही काळापासून सुरू आहे. एसआयटी प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आली होती, त्याचे पुढे काय झाले. मानहानीचा दावा आमच्या विरोधात दाखल करण्यात आला. मी न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व पुरावे सादर केले. मी त्यावेळी न्यायालयाला हे देखील विचारले होत की मला जर एनसीबी काही चुकीचे करत असेल तर त्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे का, तर त्याला हो असे उत्तर मिळाले होते.

एनसीबीने उच्च न्यायालयात मलिक यांचे जावई समीर खान यांचा जामिनाला आव्हान दिले आहे. ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अटक झाल्यानंतर 27 सप्टेंबरला त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. हा जामीन रद्द करण्यासाठी परवा एनसीबीने न्यायालयात अपील केले. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या या भूमिकेवर टीका केली.