राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेच्या चौकशीचे आदेश


मुंबई – ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन रंगलेले लेटर वॉर महाराष्ट्राने पाहिले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आता मुंबई महापालिकेच्या खांद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नवा झटका दिल्याची चर्चा आहे.

राज्यपालांनी लोकायुक्तांना मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 1 हजार 844 कोटींचा घोटाळा मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेत झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आश्रय योजनेतंर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत.

या योजने अंतर्गत सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आश्रय योजनेत आतापर्यंत 1 हजार 844 कोटी रुपयांचे प्रस्ताव महानगरपालिकेत मंजूर झाले आहेत. हे प्रस्ताव मंजूर होत असताना भाजपने त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.

राज्यपालांनी याआधीही भाजप आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.