श्रीलंकेत अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली महागाई


कोलंबो – अन्नधान्याची टंचाई श्रीलंकेत निर्माण झाल्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महागाई दर आतापर्यंतचा सर्वोच्च नोंदवण्यात आला आहे. १२.१ टक्क्यांपर्यंत महागाई दर हा वाढल्यामुळे श्रीलंकेतील खाद्यपदार्थांच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहे. नोव्हेंबर २०२१ च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात २.२ टक्क्यांनी महागाई वाढली आहे.

याबाबत श्रीलंकन न्यूज रेडिओने दिलेल्या अहवालानुसार, कोलंबो ग्राहक किंमत निर्देशांकातील बदल, जो वार्षिक सरासरीच्या आधारावर मोजला, तो नोव्हेंबरमध्ये ५.३ टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये तब्बल ६ टक्क्यांपर्यंत वाढला. सेंट्रल बँकेने यावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे की पुरवठा साखळीतील घटक महागाई वाढण्यास मुख्य कारणीभूत आहेत. दर महिन्याला खाद्य आणि इतर या दोन्ही श्रेणीतील वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे, असे न्यूजरेडिओने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

त्यानंतर, नोव्हेंबर २०२१ मध्ये अन्नधान्य महागाई १७.५ टक्क्यांवरून डिसेंबर मध्ये २२.१ टक्क्यांपर्यंत वाढली, तर नोव्हेंबर २०२१ मध्ये खाद्येतर महागाई ६.४ टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये ७.५ टक्क्यांपर्यंत वाढली. दरम्यान, कृषी रासायनिक आयातीवर सरकारने मध्यंतरी बंदी घातली होती. त्यामुळे अन्नधान्याची टंचाई अधिक तीव्र झाली आहे. नोव्हेंबरमध्ये पीक न आल्यामुळे आणि नंतर शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केल्यामुळे सरकारने ही बंदी उठवली होती. पण त्याचा फटका मात्र बसला आहे.