अखेर ‘ती’ ऑडिओ क्लिप नवाब मलिकांनी केली जाहीर


मुंबई – गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये मुंबई एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर देखील थेट अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याचे आरोप करून खंडणी वसुलीचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी यावेळी समीर वानखेडे आणि एका ड्रग्ज प्रकरणातील पंच यांच्यातील कथित संभाषणाची एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली आहे. यामधील संभाषणावरून त्यांनी एनसीबीच्या डीजींनाच जाब विचारला आहे.

बॅकडेटेड पंचनाम्यांवर पंचांच्या सह्या घेत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर केला आहे. एनसीबी मुंबईचा फर्जीवाडा २०२१मध्ये उघड करण्याचे आम्ही काम केले, अधिकारी खोटी प्रकरणे बनवत होते. प्रसिद्धीसाठी लोकांना बोलवले जायचे. खंडणीचा खेळ शहरात सुरू होता. २ ऑक्टोबरच्या क्रूज छाप्यानंतर केपी गोसावी, मनीष भानुशाली यांच्या प्रकरणात बनाव केला गेला. २५ कोटींची डील झाली. आम्ही सगळे पुरावे लोकांसमोर ठेवले. एनसीबीने बचाव केला, मग एनसीबीअंतर्गतच एसआयटी बनवली. पण तरी एनसीबीचा फर्जीवाडा थांबायचे नाव घेत नसल्याचे नवाब मलिक म्हणाले.


बोगस केसेस अधिकाऱ्यांनी बनवल्या. कोऱ्या कागदावर पंचांकडून सह्या घेतल्या. खोट्या प्रकरणांत लोकांना अडकवले. आता त्याच खोट्या प्रकरणांना सुधारण्यासाठी पंचांना कशा प्रकारे फोन करून बोलवले जात आहे, आधीच्या तारखेचा पंचनामा सुधारा, असे सांगितले जात आहे, याच्या दोन ऑडिओ क्लिप असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

मलिक यांनी यावेळी त्या दोन्ही ऑडिओ क्लिप पत्रकारांना ऐकवून दाखवल्या. या क्लिपमध्ये किरण बाबू नावाचा एनसीबी अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला बॅकडेटेड पंचनाम्यावर सही करण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर कुठेतरी येण्यासाठी सांगत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. याशिवाय, दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये मॅडीने समीर वानखेडे यांनाच फोन लावून किरण बाबूने बोलावले आहे, जाऊ का? अशी विचारणा केली आणि समीर वानखेडेंनी त्याला जायला सांगितले, असे संभाषण आहे. या संभाषणात समीर वानखेडे, किरण बाबू आणि मॅडी अशा व्यक्ती असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

एनसीबीचा फर्जीवाडा अजूनही बंद होत नाही. गेल्या वर्षभरात अशा केसेस दाखल करून हजारो कोटींची वसुली केली गेली. आम्ही हवाल्याचे सगळे पुरावे दिले. एनसीबीने सांगितले व्हिजिलन्स तपास होणार. त्याचे काय झाले? एसआयटीचे काय झाले. वसुलीच्या या खेळात सगळेच सामील आहेत का?” असा सवाल नवाब मलिक यांनी केला. हा प्रकार पंचनामा बदलायचा आहे. आमचा सवाल आहे की एनसीबीचे डीजी यावर बाबू, समीर वानखेडेंवर काय कारवाई करणार? एका स्मगलरच्या माध्यमातून लाखो रुपये पीआर एजन्सीवर खर्च करून बातम्या प्लांट केल्या जात असल्याचे नवाब मलिक म्हणाले.