२०२२मध्येच कोरोनाचा खेळ खल्लास? जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितला उपाय!


वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर हे कोरोनाचे संकट नेमके कधी संपणार? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. निर्बंधांमुळे जसा अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे, तसाच तो नागरिकांच्या नियमित जीवनाला देखील बसला आहे. त्यामुळे सर्वचजण कोरोना जगातून हद्दपार होण्याची वाट पाहात असताना त्यावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

ओमिक्रॉन आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. व्यापक प्रमाणावर लसीकरण सर्वच देशांनी सुरू केले असले, तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या फक्त एकच डोस झालेली किंवा लसीचे अजिबात डोस न घेतलेली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसताना जागतिक आरोग्य संघटनेकडून दिलासादायक भूमिका मांडण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. टेड्रॉस यांनी कोरोना आणि लसीकरण याविषयी आपली भूमिका मांडली. जगातील एकही देश आज कोरोनाच्या प्रभावापासून सुरक्षित राहिलेला नाही. पण जमेची बाजू ही आहे की आपल्याकडे आज कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. तसेच, कोरोनावर उपचार करण्यासाठी देखील औषधे हाती आहेत. पण, जगात जितकी जास्त असमानता असेल, तेवढा हा विषाणू आपण कल्पनाही करू शकणार नाही किंवा बचाव करू शकणार नाही, अशा पद्धतीने घातक होऊ शकतो, अशी भिती डॉ. टेड्रॉस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या जर कोरोनावर मात करायची असेल, तर आपल्याला असमानता नष्ट करावी लागेल, असे टेड्रॉस म्हणाले. जर आपण आपल्यातील असमानता नष्ट केली, तर आपण हे कोरोनाचे संकट देखील नष्ट करू शकू. कोरोना साथीच्या तिसऱ्या वर्षात आपण प्रवेश करत असताना मला विश्वास वाटतो आहे की आपण याच वर्षी कोरोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न केले तर, असे टेड्रॉस म्हणाले.

दरम्यान, टेड्रॉस यांनी यावेळी बोलताना कोरोनाला पराभूत करायचे असेल, तर प्रत्येक देशातील किमान ७० टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत असायला हवी, असे म्हटले आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्रपणे काम करून हे जागतिक लक्ष्य साधायला हवे. २०२२ च्या मध्यापर्यंत हे लक्ष्य आपण सगळ्यांनी मिळून साध्य करायला हवे, असे ते म्हणाले.

लसीकरणासाठी जगभरातील प्रत्येक देशाने व्यापक प्रयत्न सुरू केले आहेत. विकसित किंवा काही विकसनशील देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. पण, पुरेसा लसींचा साठा मागास देशांमध्ये अद्याप पोहोचलेला नाही. लसींचा साठा असला, तरी तेथील नागरिकांना लसीकरण करण्यासाठीची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळेच डॉ. टेड्रॉस यांनी सुरुवातीपासूनच गरीब देशांना मदतीचा हात देण्याचे आवाहन श्रीमंत देशांना केले आहे.