घरांचा मालमत्ता कर माफ करण्याच्या शिवसेनेच्या घोषणेनंतर भाजपचा टोला


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली. मुंबईकरांना महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नववर्षाची ही भेट देत शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी केली. १६ लाख घरांचा मालमत्ता कर या निर्णयामुळे माफ होणार आहे. त्यानंतर आता विरोधकांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हिवाळी अधिवेशना दरम्यान ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता कायद्यात सुधारणा करण्याकरिता सरकारला प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बैठकीत दिला.


या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत शिवसेनेचा विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली, तेव्हा मुंबईकरांची आठवण झाली असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता, तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सुट दिली. बार, पब, रेस्टॉरंटना परवाना शुल्कामध्ये सवलत दिली. विदेशी दारुला करात ५० टक्के सुट दिली. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबईकरांची आठवण झाली!, असे शेलार यांनी म्हटले आहे.


त्याचबरोबर आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखे पासून ५०० चौ.फु.घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा! अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरे ५०० चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही ५०० चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा? ५०० चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का?, असा सवाल आशिष शेलार यांनी ट्विवरून विचारला आहे.


भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही या निर्यणानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे? मालमत्ता करमाफीची घोषणा मुंबई सोबत महाराष्ट्रवासीयांसाठी का नाही? इतर महापालिका नगरपालिकांमध्ये मराठी माणूस रहात नाहीत का? मराठी माणसात भेदाभेद कशाला करत आहात?, असे सवाल केशव उपाध्ये यांनी विचारले आहेत.