असदुद्दीन ओवेसींनी मोदींचे तीन यार सांगत साधला निशाणा


सहारनपूर – नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार, असे ओवेसी यांनी म्हटले. विशेष म्हणजे त्यांनी ट्विटरवर हे म्हणत असल्याचा व्हिडिओही ट्विट केला आहे.


यानंतर ओवेसी यांनी आपला मोर्चा अमित शाह यांच्याकडे वळवताना म्हटले की, आता अमित शहांना उत्तर द्यायचे आहे. आम्ही कोणाचे कर्ज बाकी ठेवत नाही. ओवेसी म्हणाले, नसीमुद्दीनचे नाव घेतले, पण काँग्रेस पार्टी तर बोलणार नाही. नसीमचे नाव घेतले, तर आमची मते मिळणार नाहीत. काँग्रेस इमरानचे नाव घेणार नाही. समाजवादी पार्टी आझमचे नाव नाही घेणार पण अमित शहा आणि मुख्यमंत्री योगींना आम्ही सांगू इच्छितो की, उत्तर प्रदेशमध्ये योगी ‘राज’ (Raj) आहे. त्याचा अर्थ R (र) – रिश्वत(लाच), A – ‘अ’ अपराध(गुन्हा) किंवा आतंक(दहशत), आणि ‘J’ ‘अ’ चा अर्थ जातीवाद. अमित शहा तुमचे कर्ज फिटले.

हरिद्वारच्या धर्मसंसदेतील द्वेषपूर्ण वक्तव्यांचा मुद्दाही ओवेसी यांनी या जाहीर सभेत उपस्थित केला आणि ही धर्मसंसद भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पार पडल्याचे सांगितले. देशात मुस्लिमांच्या हत्येची चर्चा होत असताना त्याविरोधात कोणी आवाज का उठवत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.