जानेवारी महिन्यात राज्यात सक्रिय रुग्ण दोन लाखांच्या पार जाण्याची शक्यता


मुंबई – एकीकडे नव्या वर्षात पदार्पण केलेले असतानाच दुसरीकडे जगासह देशावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढतानाच पाहायला मिळत आहे. त्यातच महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईत रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढलेला पाहायला मिळत आहे. आता महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. यात जानेवारी महिन्यात राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, सध्या करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डेल्टा व्हेरिएंट 70 टक्के रुग्णांमध्ये आढळून आल्यामुळे प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असून जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखाच्या पार जाणार असल्याची शक्यता आहे.

पुढे धोक्याचा इशारा देत आरोग्य सचिवांनी म्हटले की, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका नाही. ओमिक्रॉन सौम्य आहे, असे समजू नका. लसीकरण न झालेल्या आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांसाठी ओमिक्रॉन जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असेल. यामध्ये रुग्णसंख्याही वेगाने वाढेल. त्यामुळे लसीकरणावर भर देत लसीकरण वाढवा.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. काल दिवसभरात राज्यात आठ हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये मुंबईमधून सर्वाधिक 5 हजार 631 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.