वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू

नवीन वर्षाच्या निमित्ताने जम्मू काश्मीर मधील प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीत एकाएकी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाल्याचे आणि २० हून अधिक भाविक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पहाटे सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. जम्मू पोलीस आणि सुरक्षा दले मदतकार्य करत असून जखमींना नारायना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. हा प्रकार का घडला याची चौकशी सुरु असून प्राथमिक माहितीनुसार गर्दी प्रचंड वाढल्याने काही लोकांच्यात वादावादी सुरु झाली आणि त्याचे पर्यवसान चेंगराचेंगरीत झाले. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृताना २-२ लाख तर जखमींना ५० हजार अनुदान राशी देण्याची घोषणा केली आहे. जम्मू प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकाना १० लाख तर जखमींना प्रत्येकी दोन लाख मदत दिली जात असल्याचे जाहीर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रचंड मोठ्या संखेने भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. जम्मू काश्मीरचे एलजी मनीष सिन्हा म्हणाले दरवर्षी प्रमाणे यंदाही त्रिकुट पर्वतावर भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. अपघातात मृत्यू मुखी पडलेल्यात एक जम्मू काश्मीर मधील असून बाकी उत्तर प्रदेश, दिल्ली मधील असल्याचे समजते आहे. अपघात झाल्यावर परिस्थिती पूर्वपदावर आली आहे आणि भाविक दर्शन घेत आहेत. या अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमली गेली आहे.