२०२२ मध्ये हे बॉलीवूड किड्स करणार डेब्यू

बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्यांची पुढची पिढी नव्या वर्षात बॉलीवूड मध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. यातील कुणाचे नशीब साथ देईल आणि कोण फेल जाईल हे आत्ताच सांगता येणार नसले तरी बॉलीवूड इतिहासात प्रथमच तीन स्टार किड्स एकाच चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर प्रथम येणार आहेत.

अमली पदार्थ प्रकरणात अटक झाल्याने अजूनही चर्चेत असलेला शाहरुख पुत्र आर्यन खान या वर्षात डेब्यू करत असून दिग्दर्शक करण जोहर त्यांला लाँच करणार आहे. आर्यनने बहिण सुहाना प्रमाणे अमेरिकेतून चित्रपट विषयक शिक्षण घेतले आहे. संजय आणि महिप कपूर कन्या शनाया सुद्धा करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटातून या वर्षात पदार्पण करते आहे. शनाया यापूर्वीच करण जोहरच्या टॅलेंट मॅनेजमेंट फर्म मध्ये सामील झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

शाहरुख कन्या सुहाना भाऊ आर्यनच्या केस मुळे प्रसिद्धीच्या झोतात आहेच. सोशल मिडियावर ती खूपच अॅक्टीव्ह असून तिचे इन्स्टाग्रामवर २३ लाख फॉलोअर्स आहेत. ती नेटफ्लिक्स ओटीटी वर येणाऱ्या अर्चिस मधून डेब्यू करते आहेच पण तिच्यासोबत याच फिल्म मधून नंदा आणि बच्चन खानदानातील अगस्त्य नंदा सुद्धा डेब्यू करत आहे. अगस्त्यच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे कारण तो बच्चन आणि कपूर खानदानातील आहे. अगस्त्यची आजी रितू नंदा राजकपूर यांची कन्या आहे तर जया आणि अमिताभ याचे आजी आजोबा आहेत.

द अर्चिस मधून डेब्यू करणारी तिसरी स्टार कीड आहे ख़ुशी कपूर. श्रीदेवीची ही धाकटी कन्या बॉलीवूड मध्ये तिचे नशीब अजमावण्यासाठी उत्सुक आहे. तिची बहिण जान्हवी अगोदरच बॉलीवूड स्टार बनली आहे.