कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा आपल्या खातेदारांना मोठा दिलासा


नवी दिल्ली – पीएफ खातेदारांना वर्ष संपण्याआधीच नवीन वर्षाची भेट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) दिली आहे. आता घरातून कधीही आपल्या वारसांचे ई-नॉमिनेशन (E-Nomination) पीएफ खातेदार करू शकतात. त्यासाठी आता कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आली नाही. ही मुदत याआधी 31 डिसेंबर ठरवण्यात आली होती.

ई-नॉमिनेशनबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) म्हटले की, आता 31 डिसेंबर 2021 नंतरही ई-नॉमिनेशन दाखल करता येऊ शकते. पण, शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन ईपीएफओने केले आहे. आपल्यावर अवलंबून असलेल्यांना पीएफ, पेन्शन आणि विम्यासारखी सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ ई-नॉमिनेशनमुळे मिळतो.

31 डिसेंबर ई-नॉमिनेशन आणि युएएनला आधारसह लिंक करण्याची शेवटची मुदत होती. पण, यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच 28 आणि 29 डिसेंबर रोजी काही वेळेसाठी ईपीएफओचे युनिफाइड मेंबर पोर्टलमध्ये (Unified Member Portal) तांत्रिक समस्या उद्भवली होती. त्यामुळे लोकांनी ई-नॉमिनेशन प्रक्रियेसाठीची मुदत वाढवण्याची मागणी केली होती.

या प्रकारे करु शकता ई-नॉमिनेशन

  • सर्वप्रथम तुम्हाला EPFO ​​च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला UAN क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करावे लागेल.
  • पुढे मॅनेज सेक्शनवर जाऊन ई-नॉमिनेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तिथे नॉमिनीचे (वारसदार) नाव, फोटो आणि इतर तपशील द्यावा लागेल.
  • एकापेक्षा जास्त नॉमिनी (वारसदार) जोडण्यासाठी, Add New बटणावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही जर Save Family Details वर क्लिक केले तरच तुमची प्रक्रिया पूर्ण होते.