खलिस्तान समर्थक गटांकडून मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका


मुंबई – गुप्तचर यंत्रणांना खलिस्तान समर्थक गटांनी आखलेल्या दहशतवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लुधियाना न्यायालयातील बॉम्बस्फोटांशी कथित संबंध असलेल्या शीख फॉर जस्टिस संघटनेचा (SFJ) सदस्य जसविंदर सिंग मुलतानीला ताब्यात घेतल्यानंतर आणि जर्मनीत चौकशी केल्यानंतर, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये नियोजित दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळाली होती.

त्याचबरोबर या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, एसजीएफ व्यतिरिक्त, इतर प्रतिबंधित खलिस्तान समर्थक गट मुंबई, दिल्ली आणि इतर शहरांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या (ISI) संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.

भारतात शीख फॉर जस्टिस या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला असून सतर्क राहण्यास आणि संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. तर, मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रॅपिड अॅक्शन टीम आणि बॉम्ब शोधक पथकाला सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.