वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी १५ जानेवारीपर्यंत कडक नियम लागू


मुंबई – कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीपर्यंत मुंबईतील निर्बंध वाढवण्यात आले आहेत. प्रशासनाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार आता सार्वजनिक ठिकाणी जाण्याबाबतचे निर्बंधही कायम राहणार आहेत. आपल्या आदेशात प्रशासनाने मुंबईतील सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत निर्बंध १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्याचे म्हटले आहे. नागरिकांना संध्याकाळी पाच ते पहाटे पाच दरम्यान समुद्रकिनारे, मोकळे मैदान, समुद्र किनारे, उद्याने किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मुंबई पोलिसांनी मनाई केली आहे.

मुंबई पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, मानवी जीवन, आरोग्य किंवा सुरक्षिततेला धोका टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने हे निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा धोका वाढल्यामुळे आणि नवीन ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शहराला धोका अशल्याचे आदेशात म्हटले आहे. पण प्रशासनातर्फे आधीच नवीन वर्षाच्या आधी सर्व मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीनंतर महाराष्ट्रात १९८ नवीन ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात महाराष्ट्रात ५,३६८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील रुग्णसंख्येत गेल्या दोन दिवसांत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात २,१७२ नवे रुग्ण आढळले होते. हीच संख्या ४८ तासांनतर पाच हजारांपेक्षा जास्त झाली. एवढय़ा प्रंचड प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे आरोग्य यंत्रणाही सावध झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही १८ हजारांवर गेली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विवाह सोहळय़ांबरोबरच कोणत्याही समारंभात फक्त ५० जणांनाच परवानगी असेल. तसेच रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत. मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरे किंवा पर्यटनस्थळी चौपाटया किंवा समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाटया बंद केल्या जाणार आहेत.