हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे खुल्या जागेवरील नमाज पठणावरुन वक्तव्य


चंदीगड – गुरुग्राममधील सार्वजनिक ठिकाणी नमाज संदर्भात आणखी एक वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केले आहे. केवळ काही लोकांसाठी नमाज हा विषय ताकद दाखवण्यासारखा असल्याचे मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले आहे. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी दिल्लीतील एका महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की, नमाज पठण केले पाहिजे, पण दुर्दैवाने काही लोकांना वाटते की त्यातून ताकद दाखवली जाते. अशाप्रकारे कोणाला नमाज पठण करायचे असेल, तर त्यांनी प्रथम प्रशासनाशी चर्चा करावी. अशा कार्यक्रमांसाठी सर्व धर्मांचे नियम आधीच तयार करण्यात आले आहेत.

नमाज पठण करण्यास प्रत्येकजण मोकळे आहे, पण ते नियुक्त केलेल्या ठिकाणी असावे. यावर काही मतभेद असल्यास विविध धर्माचे लोक मध्यस्थीसाठी स्थानिक प्रशासनाकडे संपर्क साधू शकतात, असे मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले. पतौडीच्या घटनेबद्दल विचारले असता काही उजव्या विचारसरणीच्या तरुणांनी ख्रिसमसच्या उत्सवात व्यत्यय आणला होता. ही एक दुर्दैवी घटना आहे. अशा घटनांचे समर्थन करण्याचे कारण नाही. अशा कोणत्याही कार्यात व्यत्यय आणणे योग्य नाही, असे खट्टर म्हणाले.

३७ पैकी आठ नियुक्त ठिकाणी नमाज पठण करण्यास गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने आधीच बंदी घातली आहे. त्याचबरोबर नमाजासाठी मशिदी आणि इदगाह असताना सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करण्याची गरज नसल्याचेही सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री शेतकरी आंदोलनावर बोलताना म्हणाले, आंदोलन ज्यांनी सुरू केले आणि त्याला पाठिंबा देणारे यांच्यात फरक असणे आवश्यक आहे. कारण त्यामागे राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले लोक होते. ज्यांनी आंदोलन सुरू केले ते स्वत:ला शेतकरी नेते म्हणवतात, पण त्यांच्याही राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत.