सिंधुदुर्ग बँक निवडणूक; भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजन तेलींनी दिला राजीनामा


सिंधुदुर्ग : संपुर्ण राज्याचे तसेच जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राणे कुटुंबियांनी आपला करिष्मा दाखवून दिला. भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने या निकालांमध्ये ११ जागांवर विजय मिळवत बँकवर सत्ता काबीज केली आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीला ८ जागावर समाधान मानावे लागले.

जरी भाजपचे पॅनल जिल्हा बँक निवडणूकीत निवडून आले असले, तरी भाजपच्या १९ पैकी १९ जागा निवडून आणू न शकल्यामुळे राजन तेली यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून यापुढे काम करणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली.

दरम्यान भाजपने या निवडणुकीत जिल्हा बँकेवर सत्ता मिळवली असली, तरी भाजपचे ज्येष्ठ नेते राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. पतसंस्था मतदार संघातून राजन तेली विरुद्ध शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात झालेल्या लढतीत नाईक यांनी तेलींचा पराभव केला.

जिल्ह्यातील राजकीय वातावरण या निवडणुकी दरम्यान चांगलेच तापले होते. त्यातच सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच संवेदनशील झाली होती. भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही या हल्ला प्रकरणात आरोप झाले. तसेच त्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे, अशा वातावरणात झालेल्या या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने बाजी मारली.