कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याप्रकरणी संजय राऊत यांची भाजपवर टीका


मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करणे, हा देशद्रोहाचा गुन्हा कसा असू शकतो, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या गुन्ह्याबद्दल राज्यातही आवाज उठवणे गरजेचे आहे. शिवरायांचा वापर केवळ राजकारणासाठी करु नका, असेही वक्तव्य भाजपला संबोधून शिवसेना खासदार संजय राऊतांनी केले आहे. देशद्रोह खूप स्वस्त झालेला आहे. या देशात भाजप शासित राज्यात काही झाले, तरी गुन्हा दाखल होतो, असेही संजय राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, आजही कर्नाटक बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे 38 तरुण तुरुंगात आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला, विटंबना झाल्यानंतर त्यांनी निषेध केला. गुन्हे दाखल करू शकता? मात्र त्यांच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल केला जातो. देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, तिथे देशद्रोह सारखा गुन्हा होऊ शकतो का? देशद्रोहाचा गुन्हा थोडा स्वस्त झाला आहे का? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, हे तुम्हाला माहित नाही का? असे सवाल राऊत यांनी केले.

राऊत पुढे म्हणाले की, एका बाजूला प्रधानमंत्री काशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शौर्याचा पुरस्कार करतात आणि त्याच छत्रपतींचा अपमान होतो म्हणून बेळगावमध्ये रस्त्यावर उतरतात कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नये. हे खरमरीत पत्र लिहिण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये, कठोर पावले उचला. 38 तरुण आहेत, सर्व कायदेशीर बाबी मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वकील द्यावा. कायदेशीर बाजू त्याची सांभाळावे, अशी माझी राज्य सरकारकडे मागणी असल्याचे राऊत म्हणाले.

संजय राऊत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, माणसाचे मन भरकटले की भरकटलेल्या मनाची माणसे गांजा प्यायल्यासारखे बोलतात. राजकारणात विरोधी पक्ष ज्या पद्धतीने भरकटलेला आहे. ते पाहता त्यांच्याकडून कोणत्या वक्तव्याची अपेक्षा करणार, असे ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांना मी संयमी नेते समजत होतो. मी त्यांची भाषणे पाहतो. अभ्यासू नेते समजत होतो, असेही राऊत म्हणाले.