एनसीबीमधील समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपला


मुंबई- आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ संपत आहे. सेवा मुदतवाढ त्यांनी मागितलेली नाही. ही माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ वानखेडे यांना देण्यात आली होती. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व समीर वानखेडे यांनी केल्यामुळे ते चर्चेत आले.

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला या प्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. एनसीबीमधील त्यांचा कार्यकाळ आज समाप्त होत आहे.

आज म्हणजेच ३१ डिसेंबरला एनसीबी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ संपत असून, त्यांनी मुदतवाढ नाकारल्याचे निवेदन एनसीबीने जारी केले होते. ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत त्यांनी ९६ जणांना अटक केली असून २८ गुन्हे दाखल केले. २०२१ मध्ये त्यांनी २३४ लोकांना अटक केली आणि ११७ गुन्हे दाखल केले. एनसीबीने पुढे माहिती दिली की समीर वानखेडे यांनी सुमारे १००० कोटी रुपयांचे १७९१ किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आणि ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता गोठवली.

एनसीबीमध्ये काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिटचे (AIU) उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अतिरिक्त एसपी म्हणून समीर वानखेडे यांनी काम केले. नंतर त्यांची कस्टम्स विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि मुंबई विमानतळावर त्यांची नियुक्ती झाली. मुंबई एअर इंटेलिजेंस युनिटमध्ये काम करत असताना त्यांनी कस्टम ड्युटी चुकवणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना पकडले होते.

ते एनसीबीमध्ये ऑगस्ट २०२० साली सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दाखल झाले. स्वत:च्या हातात हे प्रकरण घेऊन त्यांनी ३३ हून अधिक जणांना अटक केली. २०२१ मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना गृह मंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले होते. अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून अनेक हाय-प्रोफाइल बॉलीवूड सेलिब्रिटींची वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली चौकशी केली आणि त्यांना अटक केली.

या वर्षी ऑक्टोबरमध्ये, समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबईतील एका क्रूझवर छापा टाकून ड्रग्जपार्टीवर कारवाई केली आणि आर्यन खानसह इतरांना अटक केली. पण नंतर, एनसीबीने छाप्यादरम्यान वापरलेल्या स्वतंत्र साक्षीदारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि अंमली पदार्थ विरोधी यंत्रणेच्या अधिका-यांनी शाहरुख खानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला.

समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही आरोप केले. त्यांनी आरोप केला की, हे अधिकारी जन्मतः मुस्लिम आहेत. पण नंतर त्यांनी अनुसूचित जातीच्या (एससी) कोट्यात नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे दाखवली.