अमेरिकेच्या ‘या’ मोठ्या कंपनीची खरेदी करणार रिलायन्स


नवी दिल्ली – शुक्रवारी (३१ डिसेंबर) उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने मोठा निर्णय घेतला. यानुसार अमेरिकेची सोलर बॅटरी कंपनी फॅराडिऑन रिलायन्सने विकत घेतली आहे. रिलायन्सने यासाठी १०० मिलियन जीबीपी म्हणजेच १,००० कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे. फॅराडिऑनच्या खरेदीबाबत रिलायन्स न्यू एनर्जी सोलर या कंपनीने प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर कंपनीचा विस्तार बाजारात करण्यासाठी रिलायन्स आणखी २५ मिलियन जीबीपी अतिरिक्त भांडवल गुंतवणार आहे. यामुळे भारतातील बॅटरी तंत्रज्ञानात मोठे बदल होतील, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत.

जगातील आघाडीची बॅटरी उत्पादक कंपनी म्हणून फॅराडिऑन ओळखली जाते. सोडिअम आयन बॅटरी तंत्रज्ञानाचे पेटंट देखील या कंपनीकडे आहे. या कंपनीचे सोडिअम आयन तंत्रज्ञान इतर बॅटऱ्यांच्या तुलनेत खूप पुढे आहे. लिथियम आयन आणि लिड अॅसिड बॅटऱ्यांपेक्षा सोडिअम आयन बॅटरी अधिक उपयोगी मानल्या जातात. फॅराडिऑनच्या सोडिअम आयन तंत्रामुळे आता रिलायन्सला बॅटरी निर्मितीत कोबाल्ट, लिथियम, कॉपर किंवा ग्रॅफाईटवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही, अशी माहिती रिलायन्सने दिली आहे.

रिलायन्सने आपल्या स्वच्छ उर्जा व्यवसायाला चालना देण्यासाठी १० ऑक्टोबरपासून सोलर, बॅटरी आणि हायड्रोजन या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत अनेक कंपन्या खरेदी केल्या आहेत. यामुळे रिलायन्सकडे या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे आगामी काळात भारतात बॅटरी क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळतील आणि बॅटऱ्यांच्या किमतीतही घट होईल, असे जाणकार सांगत आहेत. याचा थेट फायदा सौरऊर्जा क्षेत्रालाही होण्याची शक्यता आहे.

नेक वॅफ, स्टर्लिंग अँड विल्सन, स्टाईसल आणि अंब्री याच्यासोबत रिलायन्सने भागिदारी करत १.२ बिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. यातून अक्षय ऊर्जा क्षेत्रात नवी परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.