भारताकडून झालेल्या पराभवानंतर क्विंटन डी कॉकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती


सेंच्युरियन – कसोटी क्रिकेटमधून दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक आणि सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकने निवृत्ती जाहीर केली आहे. भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत पराभव झाल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेट सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तो भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीतही फार काही चांगला खेळ करु शकला नाही. तो दोन्ही डावात अपयशी ठरला. भारतीय संघाने सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा ११३ धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला.

कसोटी क्रिकेटमधून दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज क्विंट डी कॉकने निवृत्ती घेतल्यामुळे क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये तो खेळणार नाही. सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा केला. डी कॉकने जवळपास सात वर्षे कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटने याबाबत आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याच्या वाढत्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याच्या उद्देशाने तत्काळ प्रभावाने यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

सर्वांनाच २९ वर्षीय डिकॉकच्या निर्णयाने धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून डी कॉकने ५४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३३०० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ३८.८३ राहिली आहे. कसोटी सामन्यांमध्ये डी कॉकने सहा शतके आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत. सेंच्युरियन कसोटीमध्ये डी कॉकने पहिल्या डावात ३४ आणि दुसऱ्या डावात २१ धावा केल्या होत्या.