पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची आत्महत्या


पुणे – राहत्या घरी पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे शिल्पा चव्हाण असे नाव आहे. शुक्रवारी राहत्या घरी पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

पुण्यातील विश्रांतवाडी येथे शिल्पा चव्हाण या राहत होत्या. त्यांनी शुक्रवारी सकाळी राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शहर पोलीस दलात शिल्पा चव्हाण या कार्यरत होत्या. त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा विभाग तसेच एमओबी या दोन ब्रँचचा पदभार होता. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आज सकाळी त्यांना आणण्यासाठी घरी गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

वरिष्ठ अधिकारी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी हजर आहेत. शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या का केली? हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. शिल्पा चव्हाण यांची शांत आणि संयमी अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख होती. त्यांना एक मुलगा असून, तो गावी गेला होता. त्या घरी एकट्याच होत्या, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.