जळगाव आरटीओतील भोंगळ कारभार उघडकीस; परिवहन मंत्र्याच्या नावे भाजप आमदाराच्या मालकीची कार


जळगाव – आपण आजवर विभागीय परिवहन कार्यालयातील अनागोंदी कारभारापासूनचे ते दलालांच्या विळख्यांच्या अनेक बातम्या पहिल्या किंवा ऐकल्या असतील. आता असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या कारची मालकी करण्यात आली आहे. हा प्रकार जळगाव आरटीओत घडला असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही तांत्रिक चूक आहे की घोटाळा आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.

या घटनेबाबत आमदार संजय सावकारने यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही. अनिल परब यांच्या नावे आपली कार परस्पर कशी लागली याचेच आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. आरटीओ कार्यालयात या प्रकाराबाबत चौकशी केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. एखाद्या आमदाराची गाडी अशा प्रकारे परस्पर दुसऱ्याच्या नावे होत असेल, तर सर्वसामान्य जनतेचे काय असाही संतप्त सवाल त्यांनी केला. हा प्रकार म्हणजे आरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेची जळगाव आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. परिवहन अधिकारी शाम लोही यांनी म्हटले की, संजय सावकारे यांची गाडी परिवहन मंत्री यांच्या नावे परस्पर करण्यात आल्याची ही सत्य बाब आहे. या प्रकरणी प्राथमिक तपासात ऑनलाईन सिस्टममधील काही त्रुटींचा एका अज्ञात व्यक्तीने दुरुपयोग करून हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. एखादे वाहन दुसऱ्याच्या नावे करताना काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी म्हटले. आम्हीही या घटनेबाबत सखोल चौकशी करीत आहोत. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणी दोषींवर चौकशी अंती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.