सोशल मीडियावर होत आहे अंडा पाणीपुरीची जोरदार चर्चा


सध्याच्या डिजीटल युगात आपल्यापैकी अनेकजण पदार्थांसोबत नवनवे प्रयोग करून नवे काय तरी तयार करण्याचा अट्टहास धरताना दिसतात. नेटकऱ्यांना गेल्या काही वर्षात अनेक नवे पदार्थ पाहायला मिळत आहेत. पण या पदार्थांची चव कशी आहे? याबाबत ज्याचे त्याला माहिती असेल. पण नेटकऱ्यांचे लक्ष रोज नव्या पदार्थ्यांच्या डिश वेधून घेत आहेत. कधी तोंडाला पाणी सुटते, तर कधी केलेले प्रयोग पाहून संताप होतो.

पदार्थांसोबतचे नवे प्रयोग कधी कधी यशस्वी होतात. तर कधी पदरी निराशा पडते. फायर पाणीपुरीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता नेटकऱ्यांचे लक्ष अंडा पाणीपुरीने वेधून घेतले आहे. हो, आम्ही जे सांगत आहोत ते एकदम खरे आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सूरतमधील एका खाद्य पदार्थ विक्रेत्याने अंडा पाणीपुरी सुरु केली आहे.


इन्स्टाग्रामवर या अंडा पाणीपुरीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अंडा पाणीपुरी बनवण्याची पूर्ण प्रक्रिया असून फेरीवाला सुरुवातीला एका तव्यात तेल टाकतो. त्यानंतर त्यात कापलेला कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, दोन अंड्याचा पिवळा बलक टाकतो आणि स्मॅश करतो. पदार्थ चांगल्या प्रकारे शिजवतो.

ही ग्रेव्ही एका प्लेटमधील पाणीपुरीत भरताना व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर त्यावर तो दही आणि पनीरचा किस टाकतो. अशाप्रकारने अंडा पाणीपुरी तयार होते. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. पण असे करत असताना युजर्संनी अशा रेसिपींना नापसंती दर्शवली आहे. एका युजर्सने लिहिले आहे की, असे पदार्थ खाऊन पोटाला त्रास होणार, त्यामुळे असे विचित्र प्रयोग बंद करा. तर दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, अशा प्रयोगामुळे लोक मुळ पाणीपुरीचा स्वाद विसरून जातील.