सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव, राणे पॅटर्नचा डंका


सिंधुदुर्ग – अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत बाजी मारली आहे. भाजपची सत्ता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आली असून भाजपने 11 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विजय साजरा करण्यासाठी कोकणात जाणार असल्याची देखील माहिती आहे.

भाजपने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर झेंडा रोवला आहे. अनेक दिग्गजांचे वर्चस्व या निवडणुकीत पणाला लागले होते. परंतु, या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपने वर्चस्व मिळवले आहे.