येतेय रोल्स रॉइसची पहिली इलेक्ट्रिक कार

लग्झरी वाहन निर्माती रोल्स रॉइस त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत असून ‘स्पेक्ट्रम ‘ नावाने ही कार येईल असे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये स्पेक्ट्रम डेब्यू करेल आणि विक्रीसाठी २०२३ पासून उपलब्ध होईल असे समजते. ही कार जर्मनी मधील रस्त्यांवर टेस्टिंग होत असताना पाहिली गेली आहे. याचे फोटो इंटरनेट वर वेगाने व्हायरल झाले असून कार पूर्ण कव्हर केलेली दिसते आहे.

या वर्षीच्या सप्टेंबर मध्ये प्रथमच रोल्स रॉईसने इलेक्ट्रिक कार बनविली जात असल्याची घोषणा केली होती. गेली ११५ वर्षे ही कंपनी ब्रिटीश ऑटो क्षेत्रात अग्रणी राहिलेली आहे. रोल्स रॉइसची कार पैसे मोजून कुणालाही मिळत नाही तर कंपनीच त्यांचे ग्राहक निवडते अशी तिची ख्याती सांगितली जाते. रोल्स रॉइस पदरी असणे हे जगात प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. अशी ही कंपनी इलेक्ट्रिक कार आणून त्यांच्या रणनीती मधला पहिला बदल नोंदविणार आहे.

स्पाय शॉटच्या रिपोर्ट नुसार स्पेक्ट्रम एक मोठा कूप असून कारचे हे डिझाईन रोल्सरॉइसच्या अन्य लोकप्रिय मॉडेल ब्रेथ वरून प्रेरणा घेऊन केले गेले आहे. या कारचे ग्रील थोडे मोठे आहे. इंजिन, कारची किंमत किंवा रेंज या विषयी माहिती मिळालेली नसली तरी ड्युअल इलेक्ट्रिक मोटरसह ६०० हॉर्सपॉवरची बॅटरी दिली जाईल असा तर्क तज्ञ करत आहेत.