कालीचरण महाराज अकोल्याचे मुळ रहिवासी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरुद्ध अपशब्द उच्चारल्याबद्दल मध्यप्रदेशातील खजुराहो येथून अटक केले गेलेले कालीचरण महाराज सोशल मिडीयावर खूपच चर्चेत आले आहेत. त्यांनी गायलेले शिवतांडव  स्तोत्र यापूर्वीच लोकप्रिय ठरले आहे आणि त्यामुळे युवा पिढी मध्येही कालीचरण महाराज लोकप्रिय आहेत. मात्र आता त्यांना अटक झाल्यावर हे महाराज नक्की कोण याची उत्सुकता जनमानसात वाढीस लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कालीचरण महाराज यांचे मूळ नाव अभिजित सराग असे असून ते महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे रहिवासी आहेत. बालपणापासून त्यांना शिक्षणात विशेष रस नव्हता पण अध्यात्माकडे त्यांचा नेहमीच ओढा होता असे त्यांनी पूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते. अकोल्यात त्यांच्या परिवाराला ओळखणाऱ्या लोकांच्या मते कालीचरण महाराज ८ वी पर्यत शिकले आहेत. त्यानंतर त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला आहे.

कालीचरण महाराज इंदोरचे दिवंगत भय्यूजी महाराज यांच्या सहवासात राहिलेले आहेत. तेथे त्यांनी अनेक धार्मिक उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर पुन्हा अकोल्याला परतून त्यांनी नगरपरिषदेची निवडणूक लढविली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. देवी कालीचे दर्शन झाल्याचा आणि देवीने त्यांना अपघातातून बरे केल्याचा दावा ते नेहमीच करतात. महर्षी अगस्ती यांचे दर्शन झाल्याचे ते सांगतात. वयाच्या १५ व्या वर्षी महर्षी अगस्ती यांनी त्यांना लाल कपडे परिधान कर असा आदेश दिल्याचे ते सांगतात.

कालीचरण महाराज सांगतात, ‘ मी ऋषीमुनी नाही. मला चांगले कपडे आवडतात. मी दाढी करतो, कुंकू लावतो त्यामुळे मी ऋषी नाही.’