ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कार्यरत करणार जुनी जम्बो कोव्हिड सेंटर; मुंबई महापौर


मुंबई – आर्थिक राजधानी मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तीनपटीने ओमिक्रॉनचे संकट वाढत असून जुनी जम्बो कोव्हिड केंद्र कार्यरत करणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्याचबरोबर नागरिकांनी स्वत: वरच निर्बंध घालावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुढे म्हटले की, कोरोनामुळे लहान मुले बाधित होत असल्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. राज्य सरकार आणि आमचा नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. कोव्हिड सेंटरच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू असून जुनी जम्बो कोव्हिड सेंटर कार्यरत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पण, नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मोठ्या रुग्णालयांऐवजी लहान रुग्णालयांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेशिस्तपणे काही नागरिक वागत आहेत. लोकांनी मास्क वापरावे, असे आवाहनही महापौरांनी केले. तीनपटीने ओमिक्रॉनचे संकट वाढत असून तिसरी लाट दोन लाटेपेक्षा भयानक असू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मास्क न वापरणे धोकादायक ठरू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून राज्यातही संचारबंदी सुरू झाली आहे. राज्याचेच मुख्यमंत्री नाही, तर पंतप्रधान देखील बोलत आहेत, नियम न पाळल्यास लॉकडाऊन करावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. लोकांनी यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरातच साजरे करावे, असेही आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे.

महापौरांनी मास्क न वापरण्यांविरोधात क्लीन-अप मार्शलकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत म्हटले की, क्लीन-अप मार्शल यांनी मर्यादेत राहून काम करावे, असेही त्यांनी म्हटले. सध्या क्लीन-अप मार्शल चांगले काम करत आहेत. नागरिकांनी देखील आक्रमकतेपेक्षा संयम बाळगला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मुंबई बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडून शिस्त मोडली जात असल्याचे त्यांनी सांगितले. क्लीन-अप मार्शलने कारवाई केलेले बरेचजण हे मुंबई पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर व इतर नियमांचे पालन केल्यास क्लीन-अप मार्शलला कारवाईची संधीच मिळणार नसल्याचेही महापौरांनी म्हटले.