देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत धक्कादायक वाढ, काल दिवसभरात 13 हजार बाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पुन्हा एकदा धक्कादायक वाढू लागल्यामुळे केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. काल दिवसभरात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशभरात मंगळवारी 9195 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 13,154 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 268 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर देशातील ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. देशातील 22 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. महाराष्ट्रात 252 आणि दिल्लीत 263 बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 48 लाख 22 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 80 हजार 860 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 58 हजार नागरिक बरे झाले आहेत. तर अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 82,402 वर पोहोचली आहे.

काल दिवसभरात राज्यात 3 हजार 900 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मागील काही दिवसांपासून पुन्हा वाढला आहे. तर, राज्यातील ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 252 वर पोहचला आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे चिंता वाढली आहे. मुंबईमध्ये 2510 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 251 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 8060 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत.