आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून न्यूझीलंडच्या रॉस टॉलरची निवृत्ती


वेलिंग्टन – आंतरराष्ट्रीय क्रिकेटला न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरने रामराम ठोकला आहे. गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ३७ वर्षीय रॉस टेलरने निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. आपल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या पुढील दोन मालिका खेळण्याची इच्छा रॉस टेलरने व्यक्त केली आहे. या दोन मालिका बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहेत.

न्यूझीलंड सर्वात प्रथम बांगलादेशविरोधात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडला त्यांच्यात मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडविरोधात पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय सामना रॉस टेलरचा अखेरचा सामना असू शकतो.

ट्वीट करताना रॉस टेलरने म्हटले आहे की, मी होम समरनंतर आज क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करतो. बांगलादेशविरोधात होणारी कसोटी मालिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडविरोधात सहा एकदिवसीय सामने शेवटचे असतील. १७ वर्ष मला पाठिंबा दिल्याबद्धल धन्यवाद. देशासाठी खेळणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये न्यूझीलंडच्या या खेळाडूने एकूण ४४५ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण ४० शतके केली आहेत. रॉस टेलरने ११० कसोटी सामन्यांमध्ये ७५८४ आणि २२३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८५८१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावे १०२ टी-२० सामन्यांमध्ये १९०९ धावांची नोंद आहे. रॉस टेलरने कसोटीत १९ आणि एकदिवसीयमध्ये २१ शतके केली आहेत. अजून दोन कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने तो खेळणार आहे.