नसीरुद्दीन शाह ठरत आहेत मुघलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी


यापूर्वी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे वादात अडल्याचे पहायला मिळाले आहे. आता पुन्हा एकदा शाह यांनी एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे ते ट्रोल होताना दिसत आहेत. मुघलांना शाह यांनी निर्वासित असल्याचे म्हटल्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

नसीरुद्दीन शाह यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये तालिबानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव आणि टीकाही झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा शाह हे त्यांनी मुघलांबद्दल गेलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. भारतामध्ये मुघलांना कायमचे रहायचे होते, भारताला ते त्यांची मातृभूमी बनवण्यासाठी आले होते, अशा अर्थाचे वक्तव्य शाह यांनी केले आहे. सध्या सोशल मीडियावर शाह यांचा हे वक्तव्य करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अनेकदा मुघलांनी केलेले अत्याचार हे दाखवले जातात. पण आपण हे विसरतो की मुघलांनी आपल्या देशाच्या जडघडणीमध्ये हातभार लावला आहे. त्याच लोकांनी आपल्या देशामध्ये दिर्घकालीन परिणाम करणारी स्मारके उभारली आहेत, त्यांनी आपल्या देशातील नृत्य, संगीत, चित्रकला, साहित्यासारख्या कलांवर प्रभाव पाडला. हा देशच आपली मातृभूमी करण्याच्या उद्देशाने ते भारतात आलेले. तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यांना निर्वासित म्हणू शकता, असे या व्हिडीओत शाह म्हणताना दिसत आहेत.


शाह यांच्या या वक्तव्यासाठी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अशापद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य घुसखोरी करणाऱ्यांबद्दल का करावे. हे दर्जाहीन वक्तव्य आहे की मुघल हे निर्वासित होते, असे एकाने युझरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युझरने, त्यांची विचार करण्याची शक्ती त्यांनी गमावली आहे. त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आपला देशच कृतघ्न लोकांनी भरलाय आणि ते त्यापैकीच एक असल्याचा टोला लगावला आहे.