मध्य प्रदेश सरकारचा कालीचरण महाराजांना अटक केल्याने तीळपापड


भोपाळ – मध्य प्रदेशातून छत्तीसगड पोलिसांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक केली आहे. कालीचरण महाराजविरोधात छत्तीसगडच्या टिकारपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून कालीचरण महाराजला पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार होते. दरम्यान मध्य प्रदेश सरकारने अटकेच्या कारवाईवरुन नाराजी जाहीर केली आहे.

मध्य प्रदेश पोलिसांना न कळवता छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने कालीचरण महाराजला अटक करुन आंतरराज्य नियमांचे उल्लंघन केले आहे. मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांशी संवाद साधत अटकेच्या प्रक्रियेसंबंधी निषेध नोंदवण्यास सांगण्यात आले असून स्पष्टीकरण मागण्यास सांगण्यात आल्याचे मध्य प्रदेश सरकारने म्हटले आहे.

दरम्यान कोणत्याही नियमांचं उल्लंघन न करता कारवाई करण्यात आल्याचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेन बघेल यांनी सांगितले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्याला अटक केल्याबद्दल आनंदी आहोत की दु:खी हे स्पष्ट करावे, असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी कालीचरण महाराजच्या कुटुंबीय आणि वकिलांना छत्तीसगड पोलिसांनी अटकेची माहिती दिल्याचे सांगितले. तसेच २४ तासात न्यायालयात हजर केले जाणार असल्याचेही सांगितले आहे.