पहिल्या कसोटी भारताचा दक्षिण अफ्रिकेवर ११३ धावांनी ऐतिहासिक विजय


सेंच्युरिअन – भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका तीन सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ११३ धावांनी भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने या विजयासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताने पाचव्या दिवशी दक्षिण अफ्रिकेचे ६ गडी झटपट बाद केले. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ३, मोहम्मद शमीने ३, मोहम्मद सिराजने २ आणि आर. अश्विनने २ गडी बाद केले. भारताने दक्षिण अफ्रिकेच्या सेंच्युरिअन मैदानात पहिला कसोटी विजय मिळवला आहे.

जेव्हा पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा डीन एल्गर आणि टेम्बा बावुमा जोडी मैदानात जमली होती. पण जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एल्गर ७७ धावांवर असताना पायचीत झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन डिकॉक जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. क्विंटन डिकॉक २१ धावा करून तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याचा त्रिफळा उडवला. वियान मल्डर क्विंटन पाठोपाठ बाद झाला. ३ चेंडूत मल्डरने अवघी एक धाव केली. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. लगेचच मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मार्को जॅनसेन १३ धावा करून तंबूत परतला. ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कागिसो रबाडाला आपलं खातेही खोलता आले नाही. अवघ्या ४ धावा करून आर. अश्विनच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लुंगी एनगिडी दुसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि भारताला विजय मिळाला.

दक्षिण अफ्रिकेकडून एल्गरने १५६ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. तर एडन मारक्रम (१), डीन एल्गर (७७), किगन पीटरसन (१७), रस्सी वॅनदर दुस्सेन (११) आणि केशव महाराज (८), क्विंटन डिकॉक (२१), वियान मल्डर (१), मार्को जॅनसन (१३) धावा करून बाद झाले. कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांना आपले खातेही खोलता आले नाही.