अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या फादरला जन्मठेपेची शिक्षा


मुंबई – मुंबईतील एका ख्रिस्ती धर्मगुरूला एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले आहे. फादर जॉन्सन लॉरेन्स याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो न्यायालयाने बुधवारी सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला पॉक्सो कायद्यातील कलम 6 आणि 12 अंतर्गत न्यायाधीश सीमा जाधव यांनी दोषी घोषित करत ही शिक्षा सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी डिसेंबर 2015 मध्ये या 52 वर्षीय पाद्रीला अटक केली होती, तेव्हापासून तो तुरूंगातच आहे.

ऑगस्ट 2015 मध्ये चर्चमध्ये नियमित प्रार्थनेसाठी पीडित मुलगा हा जात होता. त्यादरम्यान आरोपी फादरने त्याला अनेकदा सर्वजण गेल्यानंतर एकट्याला थांबवले होते. पीडित मुलगा हा गरीब कुटुंबातून होता, त्याला चर्चमधून मिळणाऱ्या मदतीवर परिणाम होईल, या भितीने त्याने घडत असलेल्या अत्याचाराची कुणालाही लगेच माहिती दिली नाही. पण त्याच्या मानसिकतेवर हळूहळू त्याचा परिणाम होऊ लागला. तो एकटा एकटा आणि शांत राहू लागला, पुढे त्याची तब्येतही नाजूक राहू लागली आणि त्याला रूग्णालयात दाखल करावे लागले.

पीडित मुलगा आपल्या कुटुंबासोबत नोव्हेंबर 27 रोजी पुन्हा चर्चमध्ये गेला. त्यावेळी आरोपी फादरने त्याला एक बॉक्स आपल्या ऑफिसमध्ये जाऊन ठेवण्यास सांगितले आणि पाठोपाठ तोही तिथे गेला. त्या रात्री पुन्हा त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. घरी गेल्यावर पण त्या मुलाने आपल्या आईला घडलेली हकीकत सांगितली आणि त्यानंतर आईवडिलांनी याची पोलिसांत तक्रार दिली.

आपल्यावरील सर्व आरोप न्यायालयात आरोपी फादर जॉन्सन लॉरेन्सने फेटाळून लावले होते. पण सरकारी पक्षाने न्यायालयात मुलाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरसह नऊ अन्य साक्षीदार आणि अन्य पुरावे सादर करत फादरवरील आरोप सिद्ध केले.