आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला!


सिंधुदुर्ग – जिल्हा सत्र न्यायालयाने गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या प्रकरणावर अखेर अंतिम सुनावणी घेतली असून नितेश राणेंचा संतोष परब मारहाण प्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. नितेश राणे चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचा दावा या सुनावणीदरम्यान फिर्यादींच्या वकिलांनी केला होता. पण, त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बोलताना आमदार नितेश राणे यांनी तपासात पूर्ण सहकार्य केल्याचा दावा केला. या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांना मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यांनी या प्रकरणात नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. १८ डिसेंबर रोजी ही घटना घडल्यानंतर त्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात देखील उमटले होते. पण, या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केल्यापासून भाजप आमदार नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याचे दिसून येत आहे.