तैवानच्या मुद्द्यावरून चीनची अमेरिकेला पुन्हा धमकी; न झेपणारी किंमत चुकवावी लागेल


बीजिंग – तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत. तैवान स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र म्हणत असताना चीनने सातत्याने तैवानवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी दावे केले आहेत. अमेरिकेने या पार्श्वभूमीवर तैवानच्या बाजूने आपली ताकद उभी करण्याचे जाहीर केल्यानंतर आता थेट अमेरिकेलाच चीनने धमकी दिली आहे. चीनने याआधी देखील अमेरिकेला इशारा दिला होता. पण, काही दिवसांपूर्वी नमते घेण्याचे सूतोवाच चीनकडून देण्यात आले होते. पण, आता पुन्हा एकदा धमकीची भाषा करायला चीनने सुरुवात केली आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी तेथील सरकारी वृत्तवाहिनीसोबत बोलताना अमेरिकेच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच, अमेरिका चूक करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अमेरिका तैवानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देऊन मोठी चूक करत आहे. अमेरिकेने असे करून तैवानला एका भयंकर परिस्थितीमध्ये आणून सोडले आहे. पण त्याचबरोबर अमेरिकेला यासाठी न झेपणारी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच वँग यी यांनी दिला आहे.

सध्या तैवानमध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे. पण, चीन गेल्या दोन वर्षांपासून तैवान हा आपलाच भाग असल्याचा दावा करत आहे. चीनकडून यासाठी आक्रमकपणे लष्करी आणि धोरणात्मक हालचाली केल्या जात आहेत. यामुळे तैवानची राजधानी तैपेईमधील वातावरण तणावपूर्ण झाले असून अमेरिकेमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळेच चीनला आवर घालण्यासाठी अमेरिकेने तैवानची बाजू घेतली आहे.

पुन्हा विलीन चीनमध्ये होण्याशिवाय तैवानकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नसल्याचे देखील वँग यी म्हणाले आहेत. पण, असे असले, तरी तैवान आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र आहोत. आमचे स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही लढा देऊ, असा निर्धार तैवानने स्पष्ट केला आहे. या पार्श्वभूमीवर तैवान-चीन यांच्यासोबतच या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध देखील ताणले गेले आहेत.