दोन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या मुलीच्या लग्नसोहळ्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण


मुंबई – भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्यांनी स्वतः यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे. विशेष म्हणजे २८ तारखेला मुंबईत हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा पार पडला होता. अनेक मोठ्या नेत्यांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या विवाहसोहळ्यातील पाहुण्यांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता, ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती, असे म्हटले आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील या विवाहसोहळ्याला उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळेंनी बुधवारी त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अंकिता आणि निहार ठाकरेंच्या लग्नाला उपस्थित होते. या विवाहसोहळ्यात हजेरी लावलेले नेते एकापाठोपाठ एक कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत, त्यामुळे येत्या काळात आणखी काही लोक बाधित होण्याची शक्यता आहे.