ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे लॉकडाऊनबाबत मोठे वक्तव्य


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ होऊ लागल्यामुळे ठाकरे सरकारने नव्याने निर्बंध लावले आहेत. पण सर्वसामान्यांकडून अद्यापही नियमांचे पालन होत नसल्यामुळे हे निर्बंध अजून कठोर केले जातील असा इशाराही देण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावले असून महाराष्ट्रातही ती वेळ येण्याची शक्यता आहे. काल दिवसभरात राज्यात ३,९०० बाधित आढळले असून त्यात सर्वाधिक २५१० बाधित मुंबईत आढळले आहेत. मुंबईसह ठाणे परिसरात एकाच दिवसात दुप्पट रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री यांनी वेळ पडली तर राज्यात लॉकडाऊन लागू शकतो, असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असून तसे चित्र देखील दिसत असल्यामुळे सरकारने जरी नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करायचे असेल तरी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. प्रत्येकाने आपला आनंद, उत्साह घरात राहूनच साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी येणे टाळावे आणि कोरोनाच्या वाढीला हातभार लावू नये. प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले.

दरम्यान काही ठिकाणी अजूनही गर्दी होत असून दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर निर्बंध लागू शकतात का? असे विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, जे काही निर्बंध सरकारने घालून दिले आहेत, त्यांचे पालन झाले नाही आणि उद्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर लॉकडाऊनपर्यंत जावे लागेल, त्याव्यतिरिक्त पर्याय नाही. सरकारच्या मनात लॉकडाउन लावण्याचा विचार नाही, पण परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित सर्व मोठ्या पार्ट्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. यासंबधी नियमावली जाहीर करण्यात आली असून त्याचे पालन झालेच पाहिजे, असे आवाहन यावेळी त्यांनी केली. तसेच लग्नातील राजकीय नेत्यांच्या गर्दीवर बोलताना त्यांनी मोठे नेते, सामान्य व्यक्ती सर्वांनीच कोरोनाच्या नियमाचे पालन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.