पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मुंबईच्या संघातून रणजी खेळणार अर्जुन तेंडुलकर


मुंबई – मुंबईच्या वीस सदस्यीय रणजी संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई संघाची निवड सलिल अंकोला, गुलाम परकार, सुनील मोरे, प्रसाद देसाई आणि आनंद याल्विगी यांच्या निवड समितीने केली आहे. ही निवड महाराष्ट्र आणि दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यांसाठी करण्यात आली आहे. भारतीय संघातून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉ याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

अर्जुन तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पोलीस ढाल स्पर्धेत एमआयजीकडून खेळताना उपांत्य सामन्यात 57 धावांत पारसी जिमखान्याच्या चार फलंदाजांना माघारी धाडले होते. शालिनी भालेकर करंडकातील एका सामन्यात त्यानं 62 चेंडूंत 85 धावांची खेळी केली. अर्जुनच्या या कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. पण पोलीस ढाल स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वोत्तम गोलंदाज ठरलेला आतिफ अत्तारवालाला निवड समितीने न्याय दिलेला नाही. फायनलच्या दोन डावांमध्ये अत्तारवालाने मिळून पारसी जिमखान्याच्या सहा आणि उपांत्य सामन्यात पार्कोफिनच्या चार विकेट्स काढल्या होत्या. त्याचाच सहकारी रॉयस्टन डायसची मात्र मुंबई संघात निवड झाली आहे.

आतापर्यंत मुंबई संघाने 41 वेळा रणजी चषकावर नाव कोरले आहे. यावेळी नऊ संघाना एलीट ग्रुप सी मध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबईचा पहिला सामना 13 जानेवारी रोजी महाराष्ट्राविरोधात होणार आहे. त्यानंतर कोलकातामध्ये 20 जानेवारी रोजी दिल्लीशी सामना होणार आहे.


रणजी चषकासाठी मुंबईचा संघ – पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तारे (विकेटकीपर), हार्दिक तमोर (विकेटकीपर), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, शशांक अटारडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिंस बडियानी, सिद्धार्थ राऊत, रोयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर.