बॉलीवूडमधील आणखी एका अभिनेत्रीला कोरोनाची लागण


देशातील कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत असतानाच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना अलिकडच्या काळात कोरोनाची लागण झालेली दिसत आहे. करिना कपूर, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, अंशुला कपूर या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या पाठोपाठ आता नोरा फतेहीची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. नोराने या संदर्भात सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नोरा फतेहीने एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. तिने लिहिले, सध्या मी कोरोनाचा सामना करत आहे. खरे सांगू तर, हे सर्व खूप कठीण आहे. डॉक्टरांचा सल्ला मी घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि मास्क वापरा. हा विषाणू खूप वेगाने पसरताना दिसत आहे. माझे दुर्दैव आहे की मला कोरोनाची लागण झाली आहे. या विषाणूची लागण कोणालाही होऊ शकते, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. तुमच्या आरोग्यापेक्षा जास्त दुसरे काहीच महत्त्वाचे नाही. सुरक्षित राहा.

दरम्यान नोरा मागच्या काही दिवसांत तिचा अल्बम साँग ‘डान्स मेरी रानी’चे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. तिने यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही हजेरी लावली होती. या प्रमोशनसाठी तिच्यासोबत गायक गुरु रंधावा देखील उपस्थित होता. त्यामुळे त्यालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नोराच्या अगोदर कपूर कुटुंबीयांपैकी अर्जुन कपूर, रिया कपूर, अंशुला कपूर तसेच अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनाही करोनाची लागण झाली आहे. अलिकडच्याच काळात अभिनेत्री करिना कपूर, अमृता अरोरा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.