नारायण राणेंना पाठवलेल्या नोटीसीवरून देवेंद्र फडणवीसांचा संताप


मुंबई – केंद्रीय राणे नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारल्यावर हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर दिले होते. आता पोलिसांनी याबाबतच राणेंना नोटीस बजावली होती. पण राणे यांनी कामामध्ये व्यग्र असल्याचे कारण सांगून हजर राहिले नाहीत. आता दिवसेंदिवस हे प्रकरण तापत असून यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले आहेत. सिंधुदुर्ग पोलिसांना या प्रकरणावरून त्यांनी सुनावले आहे.


कायदा पाळायचाच नाही, असे सिंधुदुर्ग पोलिसांनी ठरवलेले दिसते! सीआरपीसी १६०ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविता येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ अ अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी असल्याचे फडणवीसांनी ट्वीट करून म्हटले आहे.

दरम्यान, असे न केल्यास CRPC 156(3) अंतर्गत भाजप खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल, तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजप करेल, असेही फडणवीस म्हणाले आहेत.