या गावात करोडपती सुद्धा राहतात मातीच्या कच्या घरात
करोडपती म्हटले कि आपल्या नजरेसमोर मोठमोठे बंगले, हवेल्या, इमारती, अलिशान राहणीमान येते. पण विविधतेने नटलेल्या भारतात एक गाव असेही आहे जेथे करोडपती सुद्धा कच्च्या मातीच्या घरात राहतात. या गावात घरांना कुलुपे लावली जात नाहीत आणि गेल्या ५० वर्षात येथे एकही चोरी झालेली नाही. इतकेच काय पोलीस ठाण्यात एकही अपराध नोंदविला गेलेला नाही. हे गाव राजस्थान राज्यातील अजमेर या प्रसिद्ध स्थळापासून जवळ आहे आणि त्याचे नाव आहे देवमाली.
या गावात श्रीमंत गावकरी आहेत पण कुणाच्याच नावावर गावातली जमीन नाही. घरात अत्याधुनिक सुविधा म्हणजे टीवी, फ्रीज, कुलर सारखी उपकरणे आहेत, दारात अलिशान महागड्या कार्स आहेत पण कुणाच्याही घराला पक्के छत नाही. गावातील लोक पूर्ण शाकाहारी आहेत. येथे दारू, सिगरेटचे सेवन केले जात नाही. दररोज सकाळी गावातील प्रत्येक गावकरी पहाडावर असलेल्या भगवान देवनारायणाच्या दर्शनाला अनवाणी जातात. या देवावर गावाचा गाढ विश्वास आहे आणि गावाची संपूर्ण जमीन या देवाच्या नावावर आहे.
याची अशी कथा सांगतात कि गावकऱ्यांची श्रद्धा बघून प्रसन्न झालेले भगवान देव नारायण प्रत्यक्ष गावात आले आणि त्यांनी गावकऱ्याना वरदान मागायला सांगितले. पण गावकऱ्यांनी काहीही मागितले नाही. तेव्हा जाताना देवाने त्यांना आनंदाने राहा, सुखात राहा असा आशीर्वाद दिलाच पण गावात पक्के घर बांधू नका असेही सांगितले. त्यामुळे गावात आजही एकही घर पक्के नाही. जर कुणी तसा प्रयत्न केलाच तर संकट येते असे म्हणतात.
गावात २५ वर्षे सरपंच असलेल्या भागीबाई सांगतात, आम्ही दगड आणि मातीची घरे बांधून त्यात राहतो. सिमेंट, चुना याचा वापर सुद्धा केला जात नाही. गावात ३०० कुटुंबे असून गावाची वस्ती ३००० आहे. गावात एकाच गोत्राचे सर्व लोक आहेत. वीज गेली तर तेलाचे दिवे लावले जातात. रॉकेलचा वापर केला जात नाही. गावात फक्त देवनारायण मंदिर, शाळेची इमारत पक्की बांधली गेली आहे. दर भाद्रपदात येथे मोठी यात्रा भरते. सगळी जमीन देवाची असल्याने ग्रामस्थ पशुपालन करून उदरनिर्वाह चालवितात, तर काही व्यवसाय करतात.