पुणे प्रयोगशाळेला ओमिक्रोनचा स्ट्रेन वेगळा करण्यात यश
भारतीय सार्स कोव्ह २ जिनोमिक्स कन्सोर्शियाच्या ताज्या बुलेटीन नुसार ओमिक्रोन, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या किंवा अगोदरच करोना झाल्याने शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीज भेदण्यास सक्षम आहे. या पार्श्वभूमीवर पुणे भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद व राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (आयसीएमआर- एनआयव्ही) ने ओमिक्रोनचा स्ट्रेन वेगळा करण्यात यश मिळविले आहे. यामुळे अँटीबॉडीवर मात करण्यासाठी ओमिक्रोन काय करतो याचा शोध अधिक खोलवर जाऊन घेणे शक्य झाले आहे.
या प्रयोगशाळेत ओमिक्रोन व्हेरीयंट त्याच्या सर्व ३२ म्युटेशन सह वेगळा काढता आला हे फार मोठे यश मानले जात आहे. त्यामुळे लसीचा प्रभाव नक्की किती काळापर्यंत आणि कसा राहतो याचे अध्ययन करणे शक्य होणार आहे. पुढच्या दोन आठवड्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन विरुद्ध ओमिक्रोन किती प्रभावी याचाही अंदाज घेता येणार आहे.
ज्यांना करोना संसर्ग झाला त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होऊन सुद्धा ओमिक्रोनने त्यांच्यावर हल्ला केल्याचे काही केसेस मध्ये दिसून आले होते. लसीकरणातून निर्माण झालेल्या अँटीबॉडीज आणि संसर्गातून निर्माण झालेल्या अँटीबॉडीज ओमिक्रोन कश्या भेदतो याची तुलना नव्या शोधामुळे करता येणार आहे.
तज्ञ संशोधकांच्या म्हणण्यानुसार ओमिक्रोन स्पाईक प्रोटीन ३२ अमिनो अॅसीड मध्ये बदल झाला असल्याचे स्पष्ट दिसले आहे त्यामुळे त्यावर लस नक्कीच प्रभावी ठरणार आहे. समजा लस घेऊनही संसर्ग झाला तरी संक्रमितात गंभीर लक्षणे दिसणार नाहीत असे खात्रीने सांगता येईल.