न्यायालयाने उद्यापर्यंत राखून ठेवली नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी


कणकवली – जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे संतोष परब हल्ल्याप्रकरणी सुरू असलेली नितेश राणे यांच्या अर्जावरील अटकपूर्व जामीन याची सुनावणी पूर्ण झाली. पण, न्यायालयाने आज यावर सुनावणी करण्यास नकार दिल्यामुळे याची सुनावणी उद्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. या सुनावणीवर उद्या गुरुवारी वेळ मिळाल्यावर निर्णय घेतला जाईल, असे यावेळी न्यायालयाने सांगितले. ज्यांच्यावर हल्ला झाला ते संतोष परब न्यायालयातून बाहेर पडताना माध्यमांसमोर आले, पण त्यांनी बोलण्यास पूर्णपणे नकार दिला.

दरम्यान, नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारल्यावर हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर नारायण राणेंनी कालच्या पत्रकार परिषदेत दिले होते. आता याबाबतच राणेंना पोलिसांनी नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अटकेचा वॉरंट निघाले आहे. यानंतर पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार असली तरी नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

या प्रकरणात धीरज जाधव, ज्ञानेश्वर माऊली आणि सचिन सातपुते हे तिघे आरोपी आहेत. या तिघांचा नितेश राणे आणि सचिन सावंत यांच्याशी संबंध आहे. नितेश राणेंशी या आरोपींचा संबंध असल्याचे तांत्रिक पुरावे असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात म्हटले आहे. आरोपी नितेश राणेंच्या पीएकडून सचिन सातपुते याला सातत्याने फोन करण्यात आल्याचेही सरकारी वकील म्हणाले. तर, नितेश राणेंना अटक नाही केली, तर मोर्चा काढू असे शिवसेनेचे आमदार म्हणत आहेत, सत्तेत असणारेच जर मोर्चा काढत असतील, तर मग पोलिसांवर दबाव कोण टाकत आहे, असा सवाल नितेश राणेंच्या वकिलांनी केला. तसेच नितेश राणेंच्या पीएकडून आरोपी सचिन सातपुतेला फोन केल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे ते म्हणाले.