राजेश टोपेंचे महाराष्ट्रातील निर्बंध अजून कडक करण्याचे संकेत


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून लोकांकडून कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना चिंता व्यक्त केली आहे. जर आपल्याकडे सहजासहजी गोष्टी घेतल्या, तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल, असे सांगत राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात, असा इशारा दिला आहे. आपण लसीकरणातही थोडे मागे असून ते योग्य नसल्याचे सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी १०० टक्के लसीकरणाचा निर्धार व्यक्त केला.

मागील आठ दिवसांची आकडेवारी पाहिली, तर २० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा दरम्यान अॅक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ बाधित आहेत. हा आकडा २० हजारांपर्यंत जाऊ शकतो. जर मुंबईची तुलना केली, तर मुंबईत ३०० च्या आसपास केसेस होत्या, त्या आज १३०० झाल्या आहेत. आज संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे २२०० केसेस रिपोर्ट होतील. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत असल्याची परिस्थिती आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

अॅक्टिव्ह रुग्णांची रोज जी संख्या नोंदवली जात होती, ती ४०० ते ६०० असायची. पण आज २००० च्या पुढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील, अशी परिस्थिती आहे. मुंबईत रोज ५१ हजार चाचण्या केल्या जात आहे. त्यातून २२०० पॉझिटिव्ह येत असतील चार टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे, जो चांगला नाही. त्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची गरज असल्याचा इशारा राजेश टोपे यांनी दिला.

राजधानी दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध वाढवण्यात आले आहेत. त्यांनी जुने सर्व निर्बंध आणले आहेत. मॉल्स, रेस्तराँ, लग्न सर्वांवर निर्बंध लावले आहेत. जर आपण आपल्याकडे सहजासहजी गोष्टी घेतल्या, तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे नियम कठोरपणे पाळावे लागतील. पण जर आपण नियम पाळणारच नसू तर निर्बंधांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, यासंबंधी एकत्रितपणे मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग निर्णय घेईल. कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक घेऊन वाढत असलेला पॉझिटिव्हिटी रेट, रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासंबंधी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत आज किंवा उद्या बैठक होणार असून निर्बंध अजून वाढवण्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी टास्क फोर्सचे मत विचारात घेतले जाईल.

दरम्यान नियम न पाळता लग्न किंवा मोठे कार्यक्रम पार पडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाला यावर बंधने आणावी लागतील, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. ओमिक्रॉनचे १६७ रुग्ण असून त्यातील ९१ जण बरे झाले असून डिस्चार्ज मिळाला ही जमेची बाजू आहे. कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पण कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट जास्त चिंतेता विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

८ लाखांहून लसीकरणाचा दिवसाचा रेट ५ लाखांवर आला असून हे भूषणावह नाही. मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी चर्चा झाली. त्यामुळे सर्वपक्षीय स्थानिक नेते, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटना यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि जी नकारात्मक मानसिकता आहे, ती सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरणात आपण थोडे मागे असून हे योग्य नाही. आपल्याला १०० टक्के लसीकरण करायचे असल्याचे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले.

आतापर्यंत महाराष्ट्रात १३ कोटी २१ लाख ९० हजार ३७३ लोकांचे लसीकरण झाले आहे. पहिला डोस जवळपास ८ कोटी लोक म्हणजेच ८७ टक्के लोकांनी घेतला आहे. दुसरा डोस ५७ टक्के झाले असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. ओमिक्रॉनसंबंधी जे प्रोटोकॉल सांगितले आहेत, त्याचे नियम पाळले जात आहेत.

१५ ते १८ वयोगटातील शाळकरी विद्यार्थ्यांना लस देण्यासंबंधीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली असून त्यासंबंधी आम्ही तयारीत आहोत. केंद्राने कोव्हॅक्सिनच देण्याचा निर्णय घेतला आहे. वेगळी व्यवस्था करण्याची सूचना असून प्रत्येकाला बोलवणे कठीण असून शाळेत जाऊन करता येऊ शकते का याबाबतही नियोजन सुरु आहे. व्याधी असणारे, ६० वयाच्या पुढील नागरिक, आरोग्य तसेच पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याचा जो निर्णय झाला आहे, त्याबाबत कोणती लस द्यायची याबाबत कोणताही निर्णय कळवलेला नाही. आम्ही वाट पाहत असल्याची माहिती त्यांनी दिली.