ओमिक्रॉनचा धोका अद्यापही ‘अधिकच’; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा


वॉशिंग्टन – जगभरातील ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत अद्यापही वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील एक आठवड्यात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरम्यान ओमिक्रॉनबाबत जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला असून अद्यापही धोका ‘अधिकच’ असल्याचे सांगितले. अनेक देशांमधील कोरोनाबाधितांची संख्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे वाढली आहे. ज्या देशांमध्ये डेल्टापेक्षा ओमिक्रॉन बाधितांची संख्या अधिक आहे, त्या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

आपल्या साप्ताहिक माहितीत जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, नव्या ओमिक्रॉनबाबतचा धोका अद्यापही अधिकच आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने ओमिक्रॉन व्हेरिएंट हा फैलावत असून अवघ्या दोन ते तीन दिवसात बाधितांची संख्या दुप्पट होत आहे. या वेगामुळे अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या देशांमध्ये ब्रिटन आणि अमेरिकेचाही समावेश आहे.

त्याचबरोबर एक दिलासादायक बातमी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 29 टक्क्यांनी घट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि डेन्मार्कमधील आकडेवारीनुसार डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची बाधा झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी आहे. पण, ठोस निष्कर्षासाठी आणखी आकडेवारीची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.

मागील 24 तासांमध्ये 200 कोरोनाबाधित चीनमध्ये आढळले आहेत. मागील 20 महिन्यांतील ही सर्वाधिक दैनंदिन वाढ आहे. शांक्सी प्रांताची राजधानी शीआनमध्ये 150 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 9 डिसेंबर ते सोमवारपर्यंत शीआनमध्ये 635 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

त्याचबरोबर मागील 24 तासात ब्रिटनमध्ये 98,515 कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंत ब्रिटनमध्ये 1.2 कोटी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांमध्ये 143 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.