नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी


कणकवली : भाजप आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्या शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील कणकवली येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीनावर मंगळवारी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकिलांचा प्रदीर्घ कालावधीनंतर युक्तिवाद अपूर्ण राहिल्यामुळे या प्रकरणावर आज बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी कणकवली येथे प्राणघातक हल्ला झाला होता. कणकवली पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आरोपीसह या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

ॲड. संग्राम देसाई आमदार राणे यांच्या वतीने युक्तिवाद करताना म्हणाले संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयितांची नावे पोलिसांनी गुप्त का ठेवली आहेत? राणेंना अटक करण्यासाठी ठाकरे सरकारकडून दबाव येत आहे. आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांची 24 आणि 25 डिसेंबरला चौकशी पोलिसांकडून करण्यात आली, मग आता पोलिसांना ताबा कशासाठी हवा आहे? हा सर्व ठरवून कट करण्यात आल्याचे म्हटले आहे.

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून जिल्हा न्यायालयात सुरु झालेली सुनावणी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत चालू होती. अॅड. राजेंद्र रावराणे आणि ॲड. संग्राम देसाई, ॲड. उमेश सावंत यांनी आमदार राणे यांच्या वतीने अटकपूर्व जामीन मंजुरीसाठी जोरदार युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षातर्फे नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद करण्यात आला, तो अपूर्ण राहिला आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सत्ताधारी आणि प्रशासन आमच्या विरोधात काम करत असून आमदार नितेश राणे यांना हल्लाप्रकरणात विनाकरण गोवण्यात आले आहे. केवळ खरचटले त्यासाठी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि इतर अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात याचा अर्थ पोलीस दबावाखाली काम करत आहेत. कोणताही संबंध आमदार राणे यांचा नसताना गुन्हे दाखल केले गेले आहे. त्या विरोधात आम्ही लोकशाही पद्धतीने कायदेशीर लढाई लढणार असल्याची अशी माहिती दिली.

राणे पुढे म्हणाले की, मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश राणे आमदार असल्यामुळे आम्ही मैदान सोडून पळणार नाही. यावेळी नितेश आणि कुठे आहे? हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का? अशी संतप्त प्रतिक्रिया पत्रकारांच्या प्रश्नावर राणे यांनी व्यक्त केली. मंगळवारी त्यांनी कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलिसांचे पथक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार नितेश राणे यांना शोधण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहे. राणे यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा ठपका असून त्यांच्या शोधात महाराष्ट्र पोलीस आहे. गोव्यात राणे हे असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचे एक पथक गोव्यात दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.