सुप्रिया सुळेंसह पती सदानंद सुळेंना कोरोनाची लागण


मुंबई – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती सदानंद सुळे यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सुळे यांनी याबद्दलची माहिती आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. सुप्रिया सुळे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.


दरम्यान सुळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात त्याचबरोबर निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. त्यामुळे त्या अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यांनी याविषयीची माहिती ट्वीट करुन दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये वर्षा गायकवाड म्हणाल्या, आज सकाळी मला कळले की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणे जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.