आयकर पोर्टलविरोधात असंतोष, आयकर परताव्यासाठी सोशल मीडियावर मुदतवाढीची मागणी ट्रेंड


नवी दिल्ली – आर्थिक वर्ष 2020-21 करिता आयकर परतावा दाखल करण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. तर, दुसरीकडे आयकर खात्याच्या वेबपोर्टलविरोधात नागरिकांचा असंतोष वाढत आहे. आयकर परतावा दाखल करण्यासाठी शेवटची मुदत 31 डिसेंबर असून आता ही मुदत वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावर यासाठी #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला.

याआधी केंद्र सरकारने आयकर परताव्याची मुदत ही 31 जुलैहून 30 सप्टेंबर आणि त्यानंतर आता 31 डिसेंबर केली होती. आयकर परतावा दाखल करताना वेबसाइटवर येणाऱ्या अडचणींमुळे काही दिवस साइट बंद होती. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा करदात्यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे. आताही आयकर परतावा दाखल करताना वेबसाइटमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग ट्रेंड केला. अनेकांनी उपरोधिकपणे सरकारवर टीकाही केली आहे. एका ट्विटर युजरने म्हटले की, 31 डिसेंबर ही शेवटची मुदत आयकर परताव्याचे सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्यांसाठी आहे. करदात्यांना पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे करदात्यांसाठी ही मुदत नसल्याचेही त्यांनी म्हटले. अनेकांनी मीम्सही तयार केले आहेत.

दरम्यान, आयकर विभागाने सांगितले की, एकूण 4,67,45,249 आयकर परतावे 27 डिसेंबरपर्यंत दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून आयकर विभागाने विवरणपत्र दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवसाची प्रतिक्षा न करण्याचे आवाहन केले होते. शक्य होईल तेवढ्या लवकर विवरणपत्र दाखल करावे असे आवाहन आयकर विभागाने केले होते.